ह.भ.प.तेजस महाराज कोठावळे यांनी तीर्थक्षेत्र नारायणपुर ता. पुरंदर जि. पुणे व आजूबाजूच्या परिसरात ही परिस्थिती पाहिली, जवळून अनुभवली. कीर्तनाच्या कामानिमित्ताने समाज प्रबोधन व उन्नती साधू पाहणाऱ्या त्यांच्या वृत्तीला हे काही पटत नव्हते. काही झालं तरी ही मुलं आपल्या समाजाचे भविष्य आहेत. या मुलांच्या हातात पुस्तक वह्या व पर्यायाने चांगल्या आयुष्याकडे दिशा देण्यासाठी, त्यांना मदतीचा हात म्हणून ‘आनंदग्राम गुरूकुलची’ स्थापना केली. 2014-15 या पहिल्या शैक्षणिक वर्षात 20 मुलांचे शैक्षणिक प्रवेश झाले. या मुलांमध्ये कोणाला आई आहे तर वडील नाही,वडील आहेत तर आई नाही, कोणाला तर दोन्ही नाही.
ह भ प तेजस महाराज कोठावळे यांनी गुरुकुलची स्थापना करतानाच असे ठरवले की कोणत्याही मुलांच्या पालकाकडून कुठलीही फी घ्यायची नाही .पूर्णपणे मोफत प्रवेश द्यायचा.
सुरुवातीचे 3 वर्षे स्वखर्चाने गुरुकुल चालवले. त्यांच्या या कार्यात पत्नीने ही सहभाग दिला. आईच्या मायेने तिने मुलांकडे लक्ष दिले, त्यांना खाऊ घालणे, हवे नको ते पाहिले. मुलांना कीर्तन व पखवाज वादन व शालेय शिक्षणास प्रोत्साहन देत आहे. कुठल्याही आर्थिक, सामाजिक मदतीची वाट न पाहता ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. स्वत:च्या शेतातील गहू, बाजरी व भाज्या येत असल्याने हे शक्य झाले.
परंतु जशी हळूहळू अनेक गरजू मुले येऊन राहू लागली, शिकू लागली तशी हे कुमक कमी पडू लागली.
या कार्यात सुरुवातीला पुरंदर सोशल फौंडेशन व रोटरी क्लब पुणे यांनी हात बळकट केले. सर्वात प्रथम मदतीचा हात मिळाला तो पुरंदर सोशल फाऊंडेशनचा. त्यांनी 2017 मध्ये अन्नधान्य व किराणा सामानाची मदत केली. 2018 मध्ये रोटरी क्लब पुणे यांच्याकडून मुलांना नवे बेड व गाद्या मिळाल्या.
कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून गुरुकुलाचा प्रसार चालू होता. त्या मार्फत कोणी वाढदिवस, पुण्यस्मरण या निमित्ताने अन्नदान व वस्तुदान करू लागले. मुलांची संख्या ही वाढू लागली व जागा अपुरी पडू लागली. मग दुसरी इमारत भाडे तत्वावर घेतली. शिक्षणाबरोबर त्यांना उत्तम जीवनाचे मूल्य कळावे तसेच आध्यात्म व कलेची जोपासना करता यावी म्हणून गीता पाठांतर, हरिपाठ, पखवाज वादन शिकवायला सुरुवात केली. यासोबत बाहेरील जगातून विविध शिक्षक मुलांना योग, व्यायाम, कला, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन असे विषय शिकवण्यासाठी येतात. गुरूकुलात राहण्यामुळे स्वयंशिस्त, स्वावलंबीपणा, नीटनेटकेपणा हे मुलाना आपोआप येऊ लागले.
अशी गाडी रुळावर येत असतानाच करोनाचा प्रभाव वाढला आणि संपूर्ण देश लॉक डाऊन झाला. बसलेली घडी पूर्ण विस्कटली व अनंत अडचणींचा सामना करावा लागला. आता दोन वर्षांनंतर पुन्हा कुठेतरी घडी नीट बसते आहे. या मुलांमध्ये शिक्षणाची ओढ आहे व डोळ्यात चांगले आयुष्य जगण्याची स्वप्ने आहेत. या स्वप्नांना बळकटी देण्यासाठी आम्ही मदतीचे आवाहन करत आहोत.
फोटोगॅलेरी
आनंदग्राम हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाबरोबरच आदर्श स्त्री पुरस्कार, पर्यावरण संवर्धन जागृती, निराधार स्त्रिया व वृद्धांसाठी घर बांधणी, गुरांसाठी गोठे बांधणी तसेच आदिवासी समाजात जन जागृती असे उपक्रम वेळोवेळी करण्यात येणार आहेत
कौतुकाची थाप!
गरज व आवाका दिवसेंदिवस आता वाढत आहे. इथे आज ३५ मुले शिकत आहेत पण अजुनही खूप मुले-पालक तुमच्या मदतीने इथला लाभ घेऊ शकतील.
आजमितीला वेळोवेळी विविध संस्थानी व अनेकांनी वैयक्तिक मदतीचा हात दिल अशा मोठ्या दैनिकांनी आमच्या उपक्रमांची खालील नोंद ही घेतली आहे.